मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकीवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी एकला चलोची घोषणा केली. मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलं. तसेच त्यांनी मनसेला सोबत घेण्यासही विरोध दर्शवला. या घडामोडीनंतर महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
दरम्यान, आता मुंबई महानगर पालिकेत शरद पवार मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना तातडीने फोन फिरवले आहेत. मुंबई महानगरपालिका कशी लढायची? यावर सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदिल दिला होता.
मात्र शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्याने आणखी काही प्रयत्न करणार? यावर स्पष्टता नव्हती. यावर पुढील बैठकीत शरद पवार निर्णय घेऊ शकतात. मात्र आता शरद पवार मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे. मनसेला सोबत घेऊन राज्यात सत्याचा मोर्चा काढला आता निवडणूक स्वबळावर का लढायची? अशी भूमिका शरद पवारांची असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे मनसेला सोबत घेण्यास सुरुवातीपासून काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत मित्रपक्ष आहे. असं असूनही शरद पवारांनी मनसेला सोबत घेण्यास सकारात्मकता दर्शवल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीने मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवली पाहिजे, एखादा पक्ष सोबत येत असेल तर त्यांनाही सोबत घेतलं पाहिजे, असंही पवारांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांनी एकप्रकारे काँग्रेसचा स्वबळावर निवडणूक लढण्याला अप्रत्यक्ष विरोध केला असून केवळ राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षासोबत युती करण्याचा प्रस्तावही त्यांनी अप्रत्यक्षपणे फेटाळून लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने आपली भूमिका मागे घेतली नाही, तर मुंबई महापालिकेत शरद पवार मनसे आणि ठाकरे गटाला सोबत घेऊन एक वेगळा प्रयोग करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
सत्याच्या मोर्चात एकत्र, मग महापालिका निवडणुकीसाठी का नाही?
दरम्यान मनसेसह महाविकास आघाडी की मनसे शिवाय महाविकास आघाडी यावर काँग्रेसने थेट उत्तर दिले. काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. मनसेसह महाविकास आघाडी मुंबई महापालिकेचा गड जिंकेल अशा चर्चा होत्या. पण काँग्रेसच्या भूमिकेने समीकरणं बदलली. तर आता या ज्येष्ठ नेत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे कान टोचले आहे. मतचोरी विरोधात सत्याच्या मोर्चा एकत्रित येता मग महापालिका निवडणूक वेगळी का लढवता असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे. त्यांचा वडिलकीचा सल्ला आता सर्व पक्ष ऐकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्षा गायकवाड यांची आगपाखड
खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेविषयी काल परवा मोठी आगपाखड केली. मारहाण करणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ असा सूर त्यांनी आळवला होता. त्यांच्या या वक्तव्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुजोरा दिल्याने मनसेसह महाविकास आघाडीचे स्वप्न भंगल्याचे समोर आले होते. तर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी एकदिवशीय चिंतन शिबिरानंतर मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा दिला.
शरद पवार यांचा वडिलकीचा सल्ला
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार हे सकारात्मक आहे. मनपा निवडणुकीतील आघाडी अथवा ठाकरे बंधुतील युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि काँग्रेस शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान शरद पवार हे आता ठाकरे बंधूसोबत जाणार की काँग्रेसबरोबर जाणार हे अद्याप समोर आलेले नाही.
तर मुंबई पालिका निवडणूक महाविकास आघाडीतून लढली पाहिजे. मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा एकत्र काढता मग निवडणूक का वेगळी लढता असा सवाल शरद पवार यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचा वडिलकीचा सल्ला ऐकून काँग्रेस मनसेविषयी नरमाई घेईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही
तर शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत. महाविकास आघाडी म्हणून ते वेगळे आहेत. मनसे हा महाविकास आघाडीचा भाग नाही असे वक्तव्य मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केले आहे. तर मनसे नेते राजू पाटील यांनी सुद्धा काँग्रेसच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.